◾ हेमेंद्र पाटील
बोईसर चिल्हार रस्त्यावर राजकीय खोडा घातला जात असल्याने थकलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे रस्ता पुर्ण व्हावा यासाठी गऱ्हाणे घातले. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी महत्त्वाचा असलेला रस्ता पुर्ण व्हायला पाहिजे यासाठी तातडीने उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी पालघर यांना पत्र देवून रस्ता पुर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा असे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याने आता रस्त्यांचे काम पुर्ण होईल अशा भ्रमात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राहिले. त्यांना वाटले जिल्हाधिकारी प्रमाणेच इतर अधिकारी देखील शासकीय काम तातडीने मार्गी लागतील. मात्र तसे काही झाले नसून प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्या पत्राला धुडकावून लावले आहे असे दिसून येते.
बोईसर चिल्हार रस्त्यावर रोजच अपघात होत असून या अपघातात मृत्यूमुखी पडण्याची येथील स्थानिकांनी संख्या जास्त आहे. नागझरी, चरी व वेळगाव याभागात अपुर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेकांना दुखापत झाली असून कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. याला जबाबदार नेमके कोण हा शोध स्थानिकांनीच घ्यायला हवा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून रस्त्याच्या दुतर्फा असलेली जागा संपादित करण्यात आली होती. मात्र त्यावेळी सातबारे उतारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावे वर्ग झाले नसल्याने तेच कारण पुढे करून जमीन मालकांनी वाढीव मोबदला मिळावा यासाठी रस्त्यांचे काम अडवून ठेवले होते. औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पुर्ण व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने टेबल खालून संघर्ष समितीच्या मार्फत मालकांन सोबत समझोता केला. समझोता नुसार गुंठ्या मागे तिन हजार रूपये ठेकेदाराने आपल्या पदरचे जमीन मालकांना दिले. यावेळी पासूनच विरोध केल्यानंतर अधिक पैसे ठेकेदारा कडून मिळतील अशा आशेने ठिकाणी विरोध हा होतच राहिला.
जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला रस्ता संपादित झाला असताना देखील स्थानिक राजकीय लोक रस्त्यांचे काम वारंवार बंद पाडत होते. मात्र पोलीस बंदोबस्त घेवून काम पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखील कमी पडले. महिन्याभरात पावसाळा येत असल्याने यावेळी रस्त्यांचे काम झाले नाही तर रस्ता कायमाचा रखडलेल्या स्थितीत राहिल म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पालघर जिल्हाधिकारी यांना पत्र दिले व आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकारी यांनी देखील तातडीने रस्ता व्हायला पाहिजे यासाठी प्रांत अधिकारी पालघर यांना रस्ता पुर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवावा असे आदेश महिनाभरापूर्वी दिले. मात्र स्थानिक आमदारांच्या इशारावर नाचणाऱ्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश देखील धुडकावून लावले असेच म्हणावे लागेल. जमीन मालकांना घेवून स्थानिक आमदारांनी प्रांत अधिकारी यांच्या सोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. परंतु भुसंपादन झाले असताना जमीन मालकांना पुढे करून प्रांत नेमकी कोणती संधी साधण्याच्या विचारात आहेत याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
विकास कामाला मार्गी लावण्यापेक्षा त्यामध्ये खोडा घालण्याचे काम लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांन कडूनच होत असल्याने अनेकांचे जीव घेणाऱ्या बोईसर चिल्हार रस्ता कधी पूर्ण होईल याकडे पाहतच राहावे लागणार आहे.