जिल्हा निबंधक सहकारी संस्था विभागाच्या नाकर्तेपणामुळे घोटाळेबाज निवडणुकीत उभे
◾हेमेंद्र पाटील
डहाणू जनता बँकेच्या निवडणुकीत घोटाळेबाज निवडणूक रिंगणात असल्याने आता पुढे बॅकेचे भवितव्य नेमके काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सन २००९ रोजी साधारण ६ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. त्यावेळी घोटाळेबाज अध्यक्ष व संचालक यांच्यावर सहकारी संस्था विभागाने कोणत्याही प्रकारची निलंबनाची कारवाई केली नसल्याने घोटाळेबाज आजही मोकाट पणे बॅकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी करताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातील गरीब जनतेची बॅक समजली जाणारी डहाणू जनता सहकारी बँक सन २००९ च्या घोटाळ्यात हादरून गेली. बॅक अध्यक्ष, संचालक, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांनी मिळून केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर गाजला होता. यातच गेल्या १६ वर्षांपासून उघडकीस आलेल्या बॅक घोटाळ्यातील आरोपींना जिल्हा निबंधक सहकारी संस्था विभागाने मोकळीक दिली आहे. एखाद्या घोटाळ्यात सहभागी असलेले अध्यक्ष व संचालकांवर प्रशासकीय कारवाई म्हणून निलंबन करून पुढची दोन वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदी घातली जाते. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे डहाणू जनता सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अशी कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
घोटाळेबाज आपल्या वरील कारवाई वाचविण्यासाठी पक्ष बदल करून पक्षांतर करून आम्ही घोटाळा केलाच नाही अशा प्रकारे वावरायला लागले. सत्ताधारी पक्षांचे पद पदरात पाडून अनेक प्रशासकीय कारवाई पासून स्वतः ला वाचविण्याचे काम घोटाळेबाज यांनी आजवर केले आहे. यातच जिल्हा निबंधक सहकारी संस्था विभागाचा नाकर्तेपणामुळे घोटाळेबाज पुन्हा नवीन घोटाळा करण्यासाठी बॅक निवडणूकीत उभे राहिले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले असते तर घोटाळेबाजांना आज निवडणूक रिंगणात उतरता आले नसते. बॅक घोटाळा प्रकरणात सन २००९ पासून ते २०२५ पर्यंतचा कार्यकाळ पाहिला तर डहाणू न्यायालयाने देखील या प्रकरणात दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय ठाणे यांनी हा खटला जलदगती ने चालविण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही डहाणू न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे.
घोटाळेबाज बॅक निवडणूकीत उभे राहताना राजकीय डावपेच आखत त्यांनी तत्कालीन अध्यक्ष व इतर राजकीय पाठबळ मिळवत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र डहाणू येथील माजी संचालकांना हे राजकारण समजताच त्यांनी जनता प्रगती पॅनल बनवून घोटाळेबाज उमेदवारांन विरोधात रणशिंग फुंकले आहे. भरत यांच्या बुडत्या विमानाला टेकू मिळावा यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी हा टेकू कितीकाळ टिकतो हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे. वाणगाव भागातील वर्चस्व याच विमानात बसले असून विमानाचा थोडा तोल देखील जायला लागलेला आहे. यातच आता सुज्ञ बॅकेचे मतदार विमानात बसणार की भ्रष्टाचारी विमान बुडवणार असा प्रश्न निर्माण झाला असून घोटाळ्याने भरकटत असलेले विमान २६ तारखेला कोणत्या धावपट्टी वर उतरतं हे आता येत्या काही दिवसात समजणार आहे.