तलाठ्याच्या आशीर्वादाने दलालाने ४ गुंठ्याची जमीन बनवली ४० गुंठे!
◼️डहाणू तहसील कार्यालयात तक्रार दाखल, भुमाफिया राजेंद्र राऊत व भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: डहाणू तालुक्यातील बाडापोखरण गावात एका छोट्याशा चार गुंठ्याच्या जमिनीचे ४० गुंठ्यांमध्ये रूपांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार महसूल विभागातील तलाठी आणि स्थानिक दलाल यांच्यातील संगनमताने झालेला हा फेरफार केवळ तांत्रिक घोळ नसून भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण म्हणून समोर आले आहे. याबाबत डहाणू तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बाडापोफरण येथील गट क्र. ३८/४० ही जमीन जानकीबाई जैतू भंडारी यांच्या नावावर असताना या जमीनीचे क्षेत्रफळ केवळ चार गुंठे होते. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या फेरफार नंतर याच जमीनीचे क्षेत्र अचानक ४० गुंठे झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत पालघर दर्पण ने पुरावे गोळा करून डहाणू तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. येथील भुमाफिया राजेंद्र राऊत नामक इसमाने जानकीबाई भंडारी यांच्या नावाशी त्याच्या आजीचे नाव मिळतेजुळते असल्याचा गैरफायदा घेत, ती त्याची आजी असल्याचा खोटा बनाव करून वारस म्हणून स्वतःचे नाव ८ सातबाऱ्यांवर चढवले. मूळ वारसदारांनी आक्षेप घेतल्यानंतर ७ फेरफार मागे घेण्यात आले, पण गट क्र. ३८/४० वरील फेरफार अजूनही रद्द करण्यात आलेला नव्हता. विशेष म्हणजे, या फेरफारासोबतच जमिनीचे क्षेत्रही १० पट वाढवण्यात असून तलाठ्यांच्या संगणमतानेच हा गैरप्रकार केल्याचे दिसून येत आहे.

तलाठी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन सोबत दिवसभर असणारा राजेंद्र राऊत नामक व्यक्तीने याअगोदर देखील अशाच प्रकारे खोटे वारस दाखवून जागा विक्री केल्या असून या सातबारा माफियाला महसूल विभागाचे देखील पाठबळ आहे. बाडापोफरण येथील गट क्र. ३८/४० या जमीनीचे खोटे क्षेत्र वाढविण्यासाठी तत्कालीन तलाठी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार घडवला असून पीक पाणी उताऱ्यावर चक्क जिथे जागाच नाही अशा ठिकाणी ४० गुंठे क्षेत्रावर टमाटर लागवड केल्याची नोंद दिसून येते. यामुळे सातबारा वरील क्षेत्र हे तलाठी यांच्या संगनमताने वाढविल्याचे स्पष्ट दिसून येते. तहसीलदार कार्यालयाकडे ही तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डहाणू तहसिलदार यांनी या अगोदर देखील अशाच खोट्या वारस नोंदणी प्रकरणात तलाठीला पाठीशी घालत मोकळीक दिली आहे. यामुळे आता काय कारवाई होणार हे पाहणे औचित्यांचे ठरेल.
◼️कायदेशीर कारवाईची मागणी
या प्रकाराची सखोल चौकशी करून, बनावट फेरफार रद्द करण्याची, तसेच राजेंद्र राऊत व संबंधित महसूल कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मूळ वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय संरक्षण व कार्यवाहीची मागणीही तक्रारीत नमूद आहे.
◼️भुमाफियांना पाठीशी घालणारे कर्मचारी कोण?
हा प्रकार केवळ बाडापोखरणपुरता मर्यादित नसून, डहाणू तालुक्यातील इतर भागांमध्येही अशीच यंत्रणा काम करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागात जर अशा प्रकारे भूमाफिया बनावट नातेसंबंध दाखवून जमीन हडप करत असतील, आणि त्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याने, शेतकऱ्यांचे, वारसदारांचे आणि सामान्य जनतेचे अधिकार धोक्यात आले आहेत.