पालघर दर्पण: रविंद्र साळवे
मोखाडा : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतंय तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय असा दावा करतंय परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षा आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुबंईपासून 100 किमी अंतरावर तर जव्हार तालुक्यापासून 23ते 24 किमी अंतरावर दरी डोंगरात सासून ग्रामपंचायत हद्दीतील डुंगीपाड्यातील आदिवासी बांधव आजही मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहे.
डुंगीपाडा हा समस्यांचा पाडा असून राज्यापासून तुटलेला पाडा आहे. येथ वीज, पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाहीत. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून त्या रुग्णाला न्यावे लागते.एकीकडे पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन वाढवणं बंदर मुबई वडोदरा मार्ग असे अनेक प्रकल्प उभारले जात असताना दुरीकडे शासन आदिवासींना किमान मूलभूत गरजा पुरवत नसतील तर हे कोणत्या विकासाचे धोतक आहे हा खरा सवाल आहे

◼️स्वस्त धान्यासाठी 8 किमी पायपीट
50 आदिवासी लोकवस्तीच्या डुंगीपाड्यावर अंगणवाडी गेल्या अनेक वर्षांपासून कुडा मेढीच्या झोडीत भरते , शाळा नाही, पाण्याची सोय नाही. एवढंच काय रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी 8 किमीची डोंगरमाथ्याची पायवाट तुडवत मोकाशीपाडा गाठावा लागतो. बरं एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी 2 ते 3 वेळा फेऱ्या माराव्या लागतात. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे
◼️बारमाही प्यावे लागते खड्यातून पाणी…
येथील आदिवासी बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नाही पाड्यापासून एक किमीच्या अंतरावर नदी लगत खड्डा खोदून त्यातले पाणी त्यांना प्यावे लागत यामुळे पावसाळयात त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उदभवत असून हर घर जल म्हणून डंका पिटणारी शासनाची जलजीवन मिशन योजना कुठे आहे असा सवाल उपस्थित होतो आहे

◼️आजारी व्यक्ती गरोदर मातांचा डोलीतून प्रवास
येथे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा गरोदर मातेला लाकडाची डोली करून एक किमीची डोंगराच्या पायवाटेने पवनमाळ गाठावे लागते त्यानंतर पंधरा किमी अंतरावर असलेले जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र न्यावे लागते तसेच चाकरमान्यांना बस ने येजा करण्यासाठी पायीपायी 10किमीचे अंतर पार करून खंडीपाडा जावे लागते

◼️विद्यार्थ्यांना पायवाटेने जीवघेणा प्रवास…
पिंपळकडा फाटा ते पवनमाळ हा रस्ता जवळपास २० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र आजपर्यंत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. परिणामी, सध्या या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, पावसाळ्यात या रस्त्यावरून गाडी चालवणे अशक्य बनते. अनेक वेळा डिलिव्हरीसाठी किंवा आजारी रुग्णांसाठी येणाऱ्या गाड्या चिखलात अडकून पडतात, आणि गर्भवती महिलांना पायवाटेनेच आरोग्य केंद्रात पोहचवावे लागते. येथील मुलांना दररोज पवनमाळ जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी जवळपास १ किलोमीटरचा जंगलातून आणि चढ-उताराचा मार्ग पार करावा लागतो.डुंगीपाडा वस्तीला १९५४ पासून आजतागायत कोणताही रस्ता मंजूर झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना खडतर आणि जीवघेणा प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात पायवाट चिखलमय होत असल्याने मुलं अनेकदा पडतात, कपडे खराब होतात डुंगीपाडा येथील शाळेत जाणारी विद्यार्थ्यांची संख्या ९ असून ही सर्व मुलं शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीतही न चुकता शाळेत हजेरी लावत आहेत.
◼️आम्ही वर्षानुवर्षे समस्यांचे ओझं उरावर घेऊन जगतोय आमच्या पाड्यात पाणी शिक्षण रस्ते आरोग्य कोणत्याच सुविधा नाहीत आमच्या मुलांना दररोज पायवाटेने चिखलाची वाट तुडवत शाळा गाठावी लागते लोकप्रतिनिधी आश्वासने देतात निवडून आले का दुर्लक्ष करता आम्ही अजून किती दिवस ह्या वेदना सहन करायच्या आम्ही भारताचे नागरिक नाहीत का ? हा माझा शासनाला आणि लोकप्रतिनिधींना सवाल आहे.
— विजय वड – स्थानिक आदिवासी बांधव