व्हीपीपीएलकडून ‘टोलमुक्त सर्व्हिस रोड’; स्थानिक विकासाला चालना
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाकांक्षी प्रकल्प वाढवण पोर्ट आता केवळ राष्ट्रीय व्यापारी केंद्र न राहता, स्थानिक विकासाचे नवे उदाहरण ठरणार आहे. व्हीपीपीएल (वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड) कडून स्थानिकांसाठी स्वतंत्र दोन लेनचा टोलमुक्त सर्व्हिस रोड उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुंबई येथे २९ जुलै २०२५ रोजी झालेल्या व्हीपीपीएल संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदर प्रकल्पासाठी आवश्यक वाहतूक सुलभ करण्याबरोबरच स्थानिक गावांसाठीही हा रस्ता खुला असणार आहे. त्यामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि रोजगाराच्या दृष्टीने या रस्त्याचा मोठा लाभ स्थानिकांना मिळणार आहे.
◼️संपर्कसुविधांचा कायापालट
वाढवण पोर्टसाठी सध्या आठ पदरी एनएच-२४८ एस महामार्गाचे भूमिसंपादन सुरू असून, हा महामार्ग एनएच-८ (तवा) व मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे (चिचारे) शी जोडला जाणार आहे. हा महामार्ग केवळ मालवाहतुकीसाठी नव्हे, तर प्रादेशिक दळणवळणासाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे.
या मुख्य मार्गासोबतच स्थानिकांसाठी स्वतंत्र दोन लेनचा ग्रीनफिल्ड सर्व्हिस रोड उभारला जाणार आहे. या रस्त्यात अंडरपास, क्रॉस पॅसेज, उड्डाणपूल आणि आरओबी (रोड ओव्हर ब्रिज) यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे हा रस्ता टोलमुक्त असणार असून, मासेमारी, शेती, डायमेकिंग यासारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी बाजारपेठेपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
◼️व्हीपीपीएलचा लोकाभिमुख दृष्टिकोन
व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ (भा.रा.से.) म्हणाले,
“जागतिक दर्जाचे पोर्ट उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम स्थानिकांवर व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सुधारित संपर्क सुविधांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, आरोग्य व शिक्षण सुलभ होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.”
हा सर्व्हिस रोड संपूर्णपणे सर्व हवामानात वापरता येण्यासारखा असून पर्यावरणपूरक ग्रीनफिल्ड स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या मार्गामुळे परिसरात सहाय्यक उद्योग व सेवा क्षेत्रांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
⬛वाढवण पोर्ट – भारताच्या भविष्याचा बंदर
व्हीपीपीएल ही कंपनी जेएनपीए (Jawaharlal Nehru Port Authority) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB) यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ वसलेले हे पोर्ट २४ दशलक्ष TEU क्षमतेचे असून हरित तत्त्वांवर आधारित बंदर म्हणून विकसित केले जात आहे.
३० ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे भूमिपूजन झाले. देशाच्या व्यापाराला वेग देणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक समुदायांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.