जातीचा दाखला मिळविण्यासाठी वापरले खोटी कागदपत्रे
अनुसूचित जमाती अधिकाऱ्यांची कारवाईसाठी दिरंगाई
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटा जातीचा दाखला बनविणारा घिवली गावाचा सरपंचावर साधारण अडीच वर्षे उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यातच बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला बनवला असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले असतानाही अनुसूचित जमाती अधिकाऱ्यांनी सरपंचाला कारणे दाखवा नोटीस बजावून फक्त नौटंकी केल्याचे उघडकीस आले आहे.
पालघर तालुक्यातील घिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जितेंद्र किशोर दळवी यांनी आपल्या सरपंच पदाच्या उमेदवारी करिता लागणारे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस दाखले जोडल्याबाबत १५ जानेवारी २०२२ रोजी तक्रार मोनिका गणेश गायकवाड यांनी सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पालघर यांच्याकडे केली होती. सरपंच यांनी वंशावळ पासून नावातील साधर्म्यचा फायदा घेत अन्य गावातील तीन्हाईत व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर केल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. यात सरपंचाचे आजोबा महादेव गोपाळ दळवी व वडील किशोर गोपाळ दळवी यांचे जातीचे प्रमाणपत्र व जन्मदाखला नसल्याचे व महत्वाचे म्हणजे वंशावळीमध्ये दाखविलेल्या नावात साधर्म्य नाही असे तपासात निष्पन्न झाले होते. तरीही शासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊन कारवाई साठी चालढकल करतात असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सरपंच यांनी नमूद केलेली त्याची जात ही हिंदू वारली अशी आहे. पण वंशावळीतील काकांची जात ही हिंदू कोळी अशी नमूद आहे. प्राथमिक शाळांच्या जोडलेल्या दाखल्यात ही वेगवेगळ्या जाती नमूद असल्याचे तक्रार दारांचे म्हणणे आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच जितेंद्र किशोर दळवी यांच्या विरोधात दावा तपासणीचे प्रकरण समितीसमोर आल्यानंतर या प्रकरणी दक्षता पथक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पालघर यांचे मार्फत चौकशी करण्यात आलेली होती. त्यानंतर संशोधन अधिकारी दिनकर पावरा यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी सरपंच दळवी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस बजावून वर्षे उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत संशोधन अधिकारी दिनकर पावरा यांना संपर्क साधला असता त्यांनी आपली बदली झाल्याचे सांगत या प्रकरणी कोणतेही काहीही सांगितले नाही. यातच अधिकारी बदली झाले असले तरीही नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे बनावट सरपंचावर कारवाई नेमकी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾पोलीस दक्षता पथकाच्या चौकशी अहवालात सरपंच दळवी यांच्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रक्त संबंधातील नातेवाईक यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीची नोंद या रकान्यात वारली अशा दिसून येतात तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या जन्म मृत्यू नोंदीचे गाव नमुना नंबर १४ चे उतारे यामध्ये जातीची नोंद वारली अशी आढळून आलेली आहे.
सत्ताधारी पक्षांचा सरपंच असल्याने भ्रष्ट अधिकारी करतात चालढकल
घिवली गावाचा सरपंच हा सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्यावर कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबाव वापरला जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. तक्रारदार यांनी पुरावे सादर करून देखील गेल्या तिन वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांन कडून कोणत्याही प्रकारची कारवाई बनावट सरपंचावर करण्यात आलेली नाही.