81 वर्षीय महिलेची जमीन लाटणाऱ्यांना पोलिसांची साथ; उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात भुमाफियांची दादागिरी
आंबेष्टेवाडी प्रकरणात भुमाफिया राजेंद्र राऊत ने केली जागा खरेदी करणाऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: वाढवण बंद येणार म्हणून या भागात भूमाफिया सरसावले असून बनावट कागदपत्रे तयार करून जागा विक्री केली जात आहे. असाच प्रकार आता समोर आला असुन तक्रारदार यांनी पुरावे सादर करून महिना उलटून गेला तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. असे असले तरी या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी झाल्यावर पुन्हा चौकशीचा दिखावा करणाऱ्या बोईसर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात चक्क तक्रारदार यांना भुमाफियांने दम भरला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

डहाणू तालुक्यातील आंबिष्टेवाडी येथील वेणूबाई बाबुराव पाटील या 81 वर्षीय महिलेची वडिलोपार्जित जमीन दलालांनी खोटी कागदपत्रे सादर करून जमीन विकल्याची घटना घडली आहे. वेणूबाई पाटील यांचे वडील बारकू महादया भंडारी यांच्या नावे वाढवण जवळील आंबिष्टेवाडी येथे खाते क्रमांक 248 गट क्रमांक 80/5 येथे 1.01 हेक्टर जमीन होती. याठिकाणी असलेली जागा खोटी कागदपत्रे तयार करून विकता येईल अशी शक्कल भुमाफिया राजेंद्र राऊत याने लढवली यासाठी रोहित दत्तात्रेय राऊत या आपल्या नातेवाईकाला पैशाचे आमिष दाखवून तुझ्या आजोबाचे नाव समान आहे ही जागा आपण नावावर करू असे सांगितल्याचे समोर आले आहे. यानंतर भुमाफिया यांने मयत बारकू महादया भंडारी आणि बारकू मरकड्या राऊत हे दोन्ही इसम एकच असल्याचे खोटे गॅजेट तयार केले. या नंतर या रोहित राऊत ने तहसील डहाणू यांच्या कडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. याच प्रतिज्ञापत्राच्या आधारे येथील तत्कालीन तलाठी सुरेश जाधव याला हाताशी धरून बनावट सातबारा नोंदणी फेरफार करण्यात आली. विशेष म्हणजे हा सातबारा फेरफार करताना पैशाची झापड डोळ्यांवर बांधलेल्या भामट्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही.
वेणूताई बाबुराव पाटील यांच्या मुलांनी या जागेचा सातबारा पाहिल्यावर त्यांना याबाबत आपली जागा कोणीतरी विकल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक पालघर यांच्या कडे 7 जुन 2025 रोजी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी बोईसर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या कडे तपास सोपवला होता. या दरम्यान तक्रारदार हर्षद पाटील याचा दोन ते तिन वेळा चौकशी साठी जबाब नोंदवून घेण्यासाठी बोलवलं होत. चौकशी होऊन देखील मुख्य सुत्रधार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने व महिना उलटून गेला तरी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यामुळे आपली जागा आता परत मिळत नाही पुढे काय होणार यासाठी 81 वर्षीय वेणूबाई बाबुराव पाटील या महिलेने इच्छा मरणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.
डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांना हा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी पुन्हा तक्रारदार वेणूबाई पाटील यांचा मुलगा हर्षद पाटील याला व भुमाफियांना देखील एकाच दिवशी चौकशीला बोलवलं होत. चौकशी होण्यासाठी तक्रारदार यांचा जबाब नोंदवणे सुरू असताना भुमाफिया राजेंद्र राऊत यांने उपविभागीय पोलीस कार्यालयात हर्षद पाटील यांना दमदाटी केली. यावेळी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतली. याघटने बाबत बोईसर पोलिस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे या भुमाफियांना खरच पोलिसांचा पाठींबा आहे का असा सवाल उपस्थित राहत असून कायद्याचा धाक उरला नसल्याने याप्रकरणी पालघर पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

◼️ बनावट सातबारा तयार करताना वाढवण येथील प्रितेश पाटील यांची देखील सही घेण्यात आली याबाबत प्रितेश यांना विचारणा केली असता मला सही करायला सांगितले म्हणून केली असं सांगत त्यांने अधिक बोलणं टाळले.
◼️ भुमाफिया भामटे एवढ्यावरच न थांबता यांनी ही जागा एका व्यवसायिकांला 2 कोटी रूपयांनी विकली असून जागा रजिस्टर करताना मोजकी रक्कम दाखवण्यात आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील फसवणूक झाल्याने व्यवसायिकाला आपल्या जागे पासुन मुकावे लागणार आहे.
◼️ बनावट कागदपत्रे तयार करून जागा हडपणारा राजेंद्र राऊत यांचा उभा केलेला मोहरा रोहित राऊत याला याबाबत त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी पालघर दर्पण ने विचारले असता मला फक्त सही करायला सांगितले होते असे उत्तर त्यांने दिले होते. यातच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या समोर रोहित राऊत यांने आपल्याला सही करायला सांगितले ती केली असा खुलासा केल्याची माहिती सूत्रांन कडून मिळाली आहे.