डहाणू तालुक्यातील बाडा पोखरण मत्स्य विभागाची जागा रायगड येथील खासगी कंपनीला देण्याचा घाट नेमका कोणत्या मंत्र्यांचा..
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: वाढवण बंदर लगत शासकीय जागा कुठे आहे त्या शोधून आपल्या घशात कशा जातील यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असाच प्रकार समोर आला असुन डहाणू तालुक्यातील बाडा पोखरण मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेली जागा थेट राजगडच्या खाजगी कंपनीच्या घशात सरकारने घातली आहे. येथील मोक्याच्या कोट्यवधी रुपयांच्या असलेल्या जागेवर डोळा ठेवणारा मंत्री कोण असा संतप्त सवल येथील नागरिक उपस्थित करत असून मत्स्य विभागाच्या निर्णयाचा विरोध याभागात सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ असलेल्या बाडा पोखरण या ठिकाणी मत्स्य विभागाची १७ ते १८ एकर जागा होती. शेतकऱ्यांची जागा ताब्यात घेऊन याठिकाणी ३५ वर्षांपूर्वी कोळंबी बीज उत्पादन प्रकल्प उभारला होता. मात्र कालांतराने मत्स्य विभागाच्या उदासीनतेमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प बंद पडला होता. प्रकल्प बंद पडल्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून स्थानिकांनी एकत्र येत या जागेत हजारो झाडांची लागवड केली होती .मात्र आता हाच प्रकल्प रायगड मधील एका खाजगी कंपनीच्या घशात घालण्यासाठी शासनाने निविदा काढली असून या निवेदनानंतर येथील शेकडो सुरुच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे याभागात असलेल्या मेंगलोज झाडाची देखील कत्तल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आता कुठेतरी सरकारी जमिनीवर ताबा घेऊन या जमिनी विकासाकांच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. येथील कोलंबी प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी शासनाला दिल्या होत्या. गेल्या ३५ वर्षांपासून बंद असलेल्या प्रकल्पाची जागा अचानक रायगड जिल्ह्यातील निर्मला ऑटो केअर या कंपनीच्या घशात घातल्याने या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. वाढवण बंदरामुळे सध्या या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडले असतानाच दुसऱ्या बाजूला या बंदरामुळे या भागातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होणार आहे . त्यातच ही निविदा प्रक्रिया करताना स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेतल्याने स्थानिकांकडून या जागे प्रकरणी स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

◾मत्स्य विभागाची जागा विक्रीचा घाट नेमका कोणत्या मंत्र्यांचा?
राज्यात दमदार विरोधक नसल्याने राज्यकर्ते वाटेल तसे निर्णय देवून मोक्याच्या जागा आपल्या जवळच्यांना देण्याचा घाट घालत आहेत. वाढवण बंदर परिसरात स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी व मत्स्य शेतीला चालणा मिळावी यासाठी हा कोलंबी बिज प्रकल्प नव्याने सुरू करणे गरजेचे असताना ही जागा अचानक मत्स्य विभागाने खाजगी कंपनीच्या घशात घातली आहे. या जागेवर नजर कोणत्या मंत्र्यांची पडली याचा शोध घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोट्यवधी रुपयांची जागा खाजगी कंपनीला दिल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी विरोधी पक्ष अद्यापही संधी शोधण्याच्या भुमिकेत असल्याचे दिसून येते.