◾आयटीडी कंपनीचा स्थानिकांना न्याय देण्याचा निर्धार – तरुणांसाठी शेकडो संधी
◾वाढवण बंदर प्रकल्पामुळे विकासाची नवी दिशा; रोजगार आणि व्यवसायात स्थानिकांचा सहभाग
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: देशातील सर्वात मोठा ठरणारा वाढवण बंदर प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेऊ लागला असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासन आणि कंपनी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या जागा संपादनाचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे बंदराचे काम प्रत्यक्षात वेगाने पुढे सरकणार आहे. यातच बंदराचा ठेका मिळालेल्या कंपन्या स्थानिकांना प्राधान्य देत असल्याने मोठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

बंदरातील महत्त्वाचे भराव आणि अन्य प्राथमिक कामे आयटीडी या कंपनीला सोपविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या कंपनीने सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विचार केला आहे. परिसरातील तरुणांना त्यांच्या अनुभव आणि कौशल्याप्रमाणे विविध कामे दिली जात असून, त्यामुळे रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण झाल्या आहेत. स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी वाणगाव येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरक्षारक्षक, कार्यालयीन कर्मचारी, वाहनचालक, वाहने भाडेतत्त्वावर, यंत्रसामुग्री, मजूर ते दगड वाहतूकदारांपर्यंत सर्वत्र स्थानिकांना प्राधान्य दिले जात आहे.
बंदर उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांची तपासणी करून त्यांचा साठा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून येथील काम पूर्णपणे कायदेशीर चौकटीतच सुरू आहे. यामुळे बंदराच्या कामावर असलेले संशयाचे ढग दूर होऊन, विश्वास आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंदर परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने काम सुरू करण्यासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम मोठे आव्हान होते. मात्र प्रशासनाच्या पाठबळामुळे हे काम आता सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच बंदर प्रकल्पाच्या मुख्य कामांना वेग येणार आहे. हा प्रकल्प फक्त मोठ्या उद्योगगटांच्या फायद्यासाठी नसून स्थानिक उद्योजक आणि तरुणांना स्थिर व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आहे, असा संदेश प्रत्यक्ष अनुभवातून लोकांना मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत काही भागांत असलेला विरोध कमी होऊन विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट होण्यास मदत होत आहे.
🟧 जेएनपीए तर्फे वाढवण बंदर परिसरात स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक कार्यक्रम झाले, मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष बंदराच्या कामामध्येही स्थानिकांना सहभागी करून घेतल्याने रोजगार व संधी वाढल्या आहेत. या सर्व सकारात्मक उपक्रमांमुळे स्थानिकांचा सहभाग वाढत असून, बंदराविरोधातील नाराजी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
🟦 बंदर प्रकल्पाचे काम सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांनी नेहमीच सहकार्य केले आहे. आंदोलन नेहमी सनदशीर मार्गाने व्हावे यासाठी पोलिसांची सतर्कता कायम राहिली आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रकल्प व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठीही पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विकासाच्या प्रक्रियेत शिस्त आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.
















