◾️नागरिकांनी तक्रार करून देखील त्याच्या कडे दुर्लक्ष करून अमली पदार्थांचा गोरखधंदा करणाऱ्या माफियांवर बोईसर पोलीस मेहरबान का
◾️हेमेंद्र पाटील
गेल्या महिन्याभरापासुन चर्चेत असलेल्या बोईसर ड्रग्स माफिया या प्रकरणात अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी पोलिसांना यश आलेले नाही. अनेक वर्षांपासून अवैध कामे करणाऱ्या माफियांच्या वजनाखाली येवून बोईसर पोलिसांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केल्याने आज बोईसर परिसरात अमली पदार्थ विकरणारे खुलेआम पणे आपला गोरखधंदा चालवत आहेत. नागरिकांनी तक्रार करून देखील भ्रष्टाचाराची किड लागलेल्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स माफियांना मोकाट सोडले आहे. यातच आता बोईसर मधील काही राजकीय मंडळी देखील अशा माफियांना पाठीशी घालत असल्याने तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे.
बोईसर शहरात अवैध धंद्यांना गेल्या दोन वर्षात अधिकच बडावा मिळाला आहे. पोलिस ठाण्याचा अधिकारी कोणीही आला तरी अवैध धंद्यांवर कोणत्याही प्रकारचा आळा बसवता आलेला नाही. अवैध धंदे करणाऱ्या पान टपरी पासून ते उच्चभ्रू लोकांन पर्यंत सर्वांना कायद्याच्या धाकाने आपले खिशातून काही वाटा द्यावा लागतो. एका विशिष्ट पद्धतीने कामकाज पुढे नेल्यावर कोणत्याही परिस्थितीत कोणी कितीही तक्रारी केल्या तरी पोलिसांन कडून अवैध धंदे करणाऱ्यांना मोकळी वाट करून दिली जाते. आता बोईसरचे काही पोलिस भ्रष्टाचारी आहेत असे म्हटले तर त्यावर आक्षेप घेतला जावु शकतो पण लाचलुचपत विभागाने गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाई मुळे बोईसर पोलिस ठाण्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचा मुखवटा समोर आला होता. असो आता विषय चर्चेत असलेल्या ड्रग्स प्रकरणात थोडा प्रकाश पाडण्यासाठी आज या प्रकरणातील पोलिसांना केलेले दुर्लक्ष यावर लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धती बदल करणे गरजेचे आहे.
बोईसर भागात जोमाने अमली पदार्थ विक्री सुरू असून ड्रग्स माफियांला पाठीशी घालणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र याकडे पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयाने देखील गंभीरतेने पाहिले नसल्याने अशा माफियांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोईसर शहरातील भंडार वाडा भागातील नागरिकांनी ड्रग्स विक्रीचा आरोप असलेल्या निल्या उर्फ निलेश सुर्वे यांच्या विरोधात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलिसांनी नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करून त्याला मोकळीक दिली आहे. भंडारवाडा येथील असंख्य नागरिक निलेश सुर्वे यांची तक्रार पोलिसांना करत असल्याने 2 जुलै 2021 रोजी येथील नागरिकांना मारण्याची व जिवीतास हानी पोचवली जाईल याबाबत दमदाटी करण्यात आली होती. याठिकाणी झालेल्या वादानंतर येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यावर निलेश सुर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेवून कोणत्याही प्रकारची कारवाई न करताच सोडून दिल्याचा आरोप नागरिकांनी एका तक्रारी अर्जात केला आहे.
बोईसर पोलिसांनी ड्रग्स विक्री व गुन्हेगारी वृत्तीच्या इसमावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने न्यायासाठी येथील असंख्य नागरीकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना 13 जुलै 2021 रोजी लेखी तक्रार दिली. याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर येथील युनिटला देखील लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार देणाऱ्यांना अर्जावर कोणत्याही प्रकारची पोच सही शिक्का दिला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यातच स्थानिक गुन्हे शाखेला तक्रार दिल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी दिलेल्या तक्रारी मध्ये निलेश सुर्वे हा इसम बोईसर रेल्वे स्टेशन परिसर व इतर ठिकाणी ब्राऊन शुगर हे अमली पदार्थ विक्री करतो असा स्पष्ट उल्लेख असताना देखील गेल्या आठ महिन्यांन पासुन पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे. अमली पदार्थ बाबत सर्वसामान्य नागरिक तक्रारी करत असताना देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांची विशेष चौकशी करून याप्रकरणी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई अत्यंत गरजेची आहे.
बोईसर रेल्वे स्टेशन लगत बाजूला असलेल्या जागेवर अमली पदार्थ सेवन करत असल्याचा गुन्हा निलेश सुर्वे यांच्या वर एनडीपीएस अँक्ट नुसार 19 सप्टेंबर 2019 रोजी दाखल करण्यात आला होता. सुर्वे हा अमली पदार्थ बाबत संबंधीत आरोपी असताना देखील सन 2021 मध्ये नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दुर्लक्ष केले कसे हा सवाल उपस्थित होत आहे. बोईसर रेल्वे स्टेशन परिसर बरोबरच भवानी चौक बोईसर काटकर पाडा याठिकाणी देखील गांजा बरोबरच ड्रग्स विक्रीचा कारोबार चालला जातो. याठिकाणी राजकीय पुढारी राहत असताना देखील अशा माफियांवर कारवाई बाबत एकदाही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही. सोन्याचा धुर सोडणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात बोईसर पोलिस ठाणे असल्याने याठिकाणी कितीही बेकायदेशीर कामे झाली तरी त्यातून स्वच्छ श्वास घेण्याची कला येथील अधिकाऱ्यांना अवगत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील येथील अधिकाऱ्यांन कडे दुर्लक्ष करताना दिसतात. एखाद्या जागरूक नागरिकांने लाचखोरी बाबत तक्रार केल्यावरच एखादा अधिकारी सापडत असला तरी आणखी छुपे लाचखोरी करणाऱ्यांचे मुखवटे आजूनही लपलेले आहेत. मात्र आता ड्रग्स प्रकरणात पालघरचे पोलिस अधीक्षक हे लक्ष देवुन कारवाई करतील अशी अपेक्षा सद्या तरी आपण बाळगायला हवी.
◾️ बोईसर पोलिस ठाणे हद्दीतील राणीशिगाव येथील एका नागरीकांवर अमली पदार्थ सेवन केलेल्या एकाने कोयत्याने वार केला होता. यामध्ये एका नागरीकांचा मृत्यू झाला होता. येथील नागरिकांनी अमली पदार्थ विकणाऱ्या माफियांवर कारवाई बाबत बोईसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिस अधिकारी यांनी तातडीने कारवाई केली जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र अनेक दिवस उलटून गेले असले तरी बोईसर पोलिसांच्या हाती काय लागले याची कोणतीही माहिती समजु शकली नाही. मुळात हत्या करणारा आरोपीने अमली पदार्थांचे सेवन केले होते असा आरोप होत असेल तर त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवले होते का, हा इसम कोणाकडून अमली पदार्थ विकत घेत होता याबाबत पोलिसांनी नेमका काय तपास केला हे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे आता बोईसर पोलिस आपले कर्तव्य बजावण्यासाठी कधी तत्पर होती याचीच वाट पाहणे सर्वांन साठी औचित्यांचे ठरणार आहे.