◾चालक गंभीर जखमी, दहा प्रवाशी किरकोळ जखमी; सुरत वरून महाडच्या दिशेने जात होते
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर गणेश भक्तांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.केवळ दैव बलवत्तर असल्याने अपघातात कार मधून प्रवास करणारे दहाही प्रवाशी सुखरूप आहेत.परंतु चालक गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर हालोली गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुरत वरून महाडच्या दिशेने जाणाऱ्या इको कारमध्ये दहा प्रवाशी होते.जखमींना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी सुरू होणारी गणेशोत्सवासाठी सुरत वरून रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील देवघरकडे जाणाऱ्या दहा प्रवाश्यांना घेऊन इको कार (GJ05RK2492)निघाली होती. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास महामार्गावरील हालोली गावच्या हद्दीत ओमकार धाब्यावर समोर आल्यानंतर भरधाव वेगातील कार चालकाला झोप लागली. त्यामुळे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघात ग्रस्त इको कार मधील चार महिला चार पुरुष दोन लहान मुले किरकोळ जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कार चालक राजेंद्र सुतार (वय.४२)गंभीर जखमी झाला आहे.

















