पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
वसई: राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. नादुरुस्त असलेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने खासदार राजन विचारे यांनी पुलाची पाहणी करून त्यामधील अडथळे दूर करून त्या कामाला गती देण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या आहेत.
वर्सोवा पुलाच्या कामाचे ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याची परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. त्यामुळेच २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु कोरोनाच्या महामारी व मजुरांच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे हे काम २०२२ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या मार्गावरून (पी सी यु) पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पामधील २ अंडरपास फाउंटन चौकामध्ये असल्याने त्याचे काम सुरु करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन व परवानगी आवश्यक असल्याने खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त सदानंद दाते व वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीने देण्याची विनंती करण्यात आली. व त्यावर त्यांनी या परवानग्या १५ दिवसात देऊ असे आश्वासन दिले आहे.