◾ आनंद मेळाव्याच्या नावाखाली चालवला जातो दरवर्षी जुगाराचा अड्डा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात अनधिकृत कामांना मोठी चालना मिळत असतानाच आता बोईसर ग्रामपंचायतीने जुगाराला प्रोत्साहन दिले आहे. याठिकाणी सर्कस मैदानात आनंद मेळाव्यासाठी दिलेल्या परवानगीला आता ग्रामपंचायत सदस्यांनी जोरदार विरोध केला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी यांना समर्थन देणाऱ्यांनीच विरोध केल्याने ग्रामपंचायती पुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सर्कस मैदानात आनंद मेळावा भरविण्यात आला असून याठिकाणी बोईसर ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिला आहे. विशेष म्हणजे आता हाच नाहरकत दाखला अडचणींचा मुद्दा निर्माण झाल्याने नाहरकत दाखला रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. मागील वर्षी देखील याच मैदानावर आनंद मेळावा भरविण्यात आला होता. लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, खानपानाची दुकाने यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होते. तसेच याच ठिकाणी रात्रीच्या वेळी विविध प्रकारचे जुगार खेळले जातात. यामध्ये लाखो रूपयांची लुट देखील केली जाते. काही क्षणातच पैसे कमविण्याच्या नावात येथील कामगार वर्ग जुगाराच्या आहारी जातो. यामुळे आनंद मेळाव्यासाठी दिलेली परवानगी तातडीने रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली असुन जुगाराला प्रोत्साहन ग्रामपंचायत देत आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे बोईसरच्या ग्रामपंचायत कारभारावर टीका केली जात आहे.
सर्कस मैदानात चालवल्या जाणाऱ्या या जुगाराला संरक्षण देण्यासाठी येथील राजकीय मंडळी आपले कार्यकर्ते बॉडीगार्ड म्हणून देतात. या बदल्यात त्यांना एका दिवसाचे साधारण १० हजार रुपये मिळतात. यातील थोडा वाटा आपल्या नेत्याला देखील द्यावा लागत असल्याची खात्रीलायक माहिती पालघर दर्पण कडे प्राप्त झाली आहे. ग्रामपंचायत नाहरकत दाखला देण्यासाठी एक दलाल प्रत्येक वर्षी आर्थिक वजन टाकून परवानगी मिळवतो. यावेळी नवीन आलेल्या सत्ताधारी यांना लक्षात आल्यानंतर नाहरकत दाखला रद्द करावा अशी मागणी केली गेली. बोईसर ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच सत्तेवर असले तरी शिवसेना शिंदे गटाचे नेतेच सरपंच यांच्या नकलत कामे करत असल्याचे समोर आले आहे. आनंद मेळावा साठी दिलेली परवानगी याबाबत आर्थिक गणिते असल्याचे लक्षात येताच खुद्द सरपंच यांनी हा नाहरकत दाखला रद्द करावा असे आदेश दिले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे दलालांची चांगलीच फजेती झाली आहे. यामुळे आता बोईसर ग्रामपंचायत आता नेमकी काय भुमिका घेते हे पहावे लागणार आहे.