◾स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला बंद
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: आधीच वादग्रस्त ठरलेल्या वाड्यातील कचरा भुमीतील कचरा येथील स्मशान भुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन हा रस्ताच बंद झाल्याने वाडा शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
40 हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा शहरासाठी सिद्धेश्वरी येथे एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशान भुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची आधिच दुरवस्था झाली आहे. त्यात कमी होते म्हणुन की काय येथील नगरपंचायत प्रशासनाने या स्मशान भुमी जवळच कचराभुमी केली, व आता या कचरा भुमीतील दुर्गंधीत कचरा रस्त्यावर पसरु लागला आहे. या कचरा भुमीच्या अवतीभवती फिरणारी मोकाट कुत्री, गुरे यांचा त्रास या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणा-या नागरीकांना सहन करावा लागतोच, पण आता कचरा भुमीतील कचरा येथील रस्त्यावर येऊन रस्ताच बंद झाल्याने येथील स्मशान भुमीत अंत्यविधीसाठी नेण्यात येणा- या मृतदेहाची हेलसांड होताना दिसत आहे. येथील कचरा भुमी अन्य ठिकाणी हलविण्यात यावी अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. मात्र नगरपंचायतीचे ढिम्म प्रशासन व पदाधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरात आठवड्यात दोन ते तीन व्यक्तींचे निधन होत आहे. त्यांचा अंत्यविधी येथील सिद्धेवरी या एकमेव स्मशान भुमीत केला जातो.

◾गतवर्षी याच वेळी वाड्यातील रहिवासी व आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सवरा यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी वेळी नगरपंचायत प्रशासनाने या कचरा भुमीला काही हजार रुपये खर्च करून कापडी कपड्याने झाकून घेतले होते. व दुर्गंधी येऊ नये म्हणून विशेष अशा औषधांची (डीडीटी पावडर) फवारणी करुन नगरपंचायतने आपली इज्जत वाचविण्याचा प्रयत्न केला होता.
◾मयत व्यक्तीचा शेवटचा प्रवास तरी सुखमय व्हावा असे प्रयत्न करणा-या कुटुंबियांना नगरपंचायतीच्या या गलथानपणाला सामोरे जावे लागत आहे.
— अतिष बागुल, ग्रामस्थ वाडा
◾निधी उपलब्ध होताच स्मशान भुमीच्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल.
— सुचिता पाटील, सभापती, बांधकाम विभाग नगरपंचायत वाडा