◾ नागझरी, निहे, किराट, लालोंडे भागात अनधिकृत खदानी खोदकामाला जोमाने सुरुवात; बेकायदेशीर खदानींना जिलेटीन येते कुठून
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पावसाळा संपल्यानंतर नेहमी प्रमाणे यंदाही अनधिकृत खदानींना सुरूवात झाली असून बोईसर पुर्वेकडील भागात खदान माफियांना महसूल विभागाचे देखील झुकते माप आहे. याचे कारण देखील तसेच असून मुख्य रस्त्यावर असलेल्या धोकादायक खदानींन बेकायदेशीर पणे सुरू असताना देखील महसूल विभागाचे अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. मागच्या दीड दोन वर्षांपूर्वी कारवाईच्या नावाखाली बेकायदेशीर खदानींचे मोजमाप घेण्यात आले मात्र आजवर एकाही खदान माफियांवर कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
बोईसर पुर्वेकडील निसर्गरम्य सुंदर दिसणाऱ्या डोंगरांना खदान माफियांचे ग्रहण लागले असून महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने याभागात बेकायदेशीर खदानी खोदल्या जात आहेत. येथील नागझरी, निहे, किराट, लालोंडे भागात अनधिकृत खदानी खोदकामाला जोमाने सुरुवात झाली असून याठिकाणी काही डोंगरभाग व वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वन जमिनीवर देखील मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. मुळात वन जमीन असलेल्या आजूबाजूला असलेल्या मालकी जागेवर देखील खदानींना परवानगी व राँयल्टी देताना संबंधित वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील अशा खदानींना नियमांना बगल देत परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. यातच धक्कादायक म्हणजे मागच्या वर्षी प्रस्तावित असलेल्या मुंबई अहमदाबाद जलदगती राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या भागात देखील बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या खदानींना महसूल विभागाने नियमबाह्य राँयल्टी दिली होती. तरी देखील खदान माफियांन सोबत संगणमत करणाऱ्या महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.
नागझरी निहे मुख्य रस्त्यावर शासनाने वाटप केलेल्या नविन शर्तीच्या जागेवर गट नंबर 150 मध्ये एका भूमाफियांने बेसुमार खोदकाम करून माती उत्खनन सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी खोदकाम करण्यासाठी देण्यात आली नसताना देखील बेकायदेशीर सुरू असलेल्या उत्खनना कडे महसूल विभागाचे देखील दुर्लक्ष आहे. याबाबत लगतच्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार करून देखील यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. लालोंडे येथील फरली पाडा येथे देखील नियमांना बगल देत खदानींना नियमबाह्य राँयल्टी देण्यात आल्या असून याठिकाणी गावाचा मुख्य रस्ताच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी याठिकाणी कधीही महसूल विभागाचे अधिकारी कारवाई साठी जात नाही कारण अर्थकारण आडव येत महिन्याला येणारा वाटा यामुळे तक्रार झाली तरी अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे. याठिकाणी असलेल्या खदानींचा काही भाग वनविभागाच्या हद्दीत गेला असताना देखील संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
◾ बेकायदेशीर सुरू असलेल्या खदानींना जिलेटीन येते कुठून
बेकायदेशीर खदानींना याभागात काही छुप्या पद्धतीने जिलेटीन व डिट्रेनोटर चा पुरवठा करण्यात येतो. तरी देखील संबंधित विभाग अशा खदानींची साधी चौकशी देखील करत नाही. याठिकाणी अतिशय स्फोटक असलेले जिलेटीन सहजपणे उपलब्ध होत असल्याने सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागझरी येथील जिलेटीन माफिया व बेकायदेशीर जिलेटीन विक्री व साठा करणाऱ्या प्रविण अधिकारी यांच्यावर मागील वर्षी स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून कारवाई केली होती. मात्र त्यांचा जिलेटीन परवाना रद्द करण्यात आला नसल्ल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बेकायदेशीर सुरू असलेल्या खदानींची तपासणी सुरू करण्यात येणार असून नियमबाह्य खदानींना कुठल्याही प्रकारची राँयल्टी दिली जाणार नाही. नागरिकांनी केलेल्या तक्रारी नुसार इतरही खदानींची तपासणी केली असून कारवाई करण्यात येणार आहे.
— मनिष वर्तक, मंडळ अधिकारी बोईसर