◾ साफल्य इमारतीच्या दुर्घटनेने महानगरपालिका सतर्क
पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: नालासोपारा पूर्वेकडील साफल्य इमारतीच्या दुर्घटनेनंतर महानगरपालिका सतर्क झाली असल्याचे दिसून येते आहे. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना एकमार्गी जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले आहे. अन्य धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींना महापालिकेने नोटिसा देऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत .
नालासोपारा शहरात अनेक धोकादायक इमारती ह्या अतिशय दुरावस्थेत आहेत .या इमारती ह्या कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे .त्यामुळे महापालिकेने या इमारतींना नोटिसा देऊन या धोकादायक इमारती एकमार्गी जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील ५५ वर्षीय अतिधोकादायक इमारतीवर इ प्रभागाने कारवाई करून गुरुवारी ती जमीनदोस्त केली आहे .
आचोळे रोडवर बोरी मस्जिदच्या बाजूला मुख्य रस्त्यालगत असलेले ५५ वर्षे जुनी ताहीर मंजिल ही इमारत अतिधोकादायक असल्याने गुरुवारी सकाळी मनपा ने त्यावर हातोडा मारला आहे. यावेळी तुळींज पोलिसांची टीम घटनास्थळी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली होती.तसेच अग्निशमन दल ,महावितरण कर्मचारी,पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी उपस्थित होते . इमारतीचे पाण्याचे व विजेचे कनेक्शन तोडल्यावर ही इमारत पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आली .या परिसरात अश्या अनेक धोकादायक इमारती असून यांवर टप्याटप्याने कारवाई केली जाणार आहे.