◾ लाचखोर पोलिसांवरील कारवाईने बोईसर पोलीस ठाण्यातील कार्यप्रणाली बाबत प्रश्नचिन्ह; मुंबई प्रमाणे आता बोईसरचा “वाझे” शोधणे गरजेचे
◾हेमेंद्र पाटील
तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या बोईसर पोलीस ठाण्यात बदली मिळावी यासाठी अनेक अधिकारी प्रयत्न करत असतात हे गुपित लाचखोर अधिकारी यांच्या अटके नंतर सर्वांच्या समोर आले आहे. एमआयडीसी ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी असल्याने येथे येणारा पोलीस शिपाई सुध्दा वर्षभरात आपली स्वतः ची चारचाकी गाडी सहजपणे घेतो. यावरून इथल्या आर्थिक उलाढालीची कल्पना सर्वांना येऊ शकते. असो याठिकाणी असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे सर्वांना अच्छे दिन आलेत त्याला आपण तरी काय करणार आहोत. परंतु बोईसर पोलिस ठाण्याला भ्रष्टाचाराची लागलेली किड “सद्रक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलिसांच्या अभिमानास्पद समजल्या जाणाऱ्या बोध वाक्याला पोखरून तर टाकणार नाही ना हा प्रश्न समोर येतोय.
बोईसर पोलिसांन कडुन संपूर्ण पोलीस दलाला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. अवघ्या पाच महिन्यात बोईसर पोलिस ठाण्यात दोन वेळा लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी तरी स्वतः चे आत्मपरीक्षण करायला हवे. विशेष म्हणजे बेटागाव चौकी पासून सर्व भागातील तडजोडी साठी साहेबांचा एक हुकमी एक्का काम बघत असून हा कोणता पोलिस खात्यातील व्यक्ती नसून हा खाजगी इसम आहे. स्थानिक पोलिसांन मध्ये याविषयी नाराजी असली तरी साहेबांन पुढे बोलण्याची कोणाची हिम्मत होत नसल्ल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मनात विरोधातील सल खदखदत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघात झाल्यावर किंवा दोन गटात हाणामारी याठिकाणी ठरलेले वजन ठेवल्यानंतर सर्वांना व्हीआयपी दर्जाची वागणूक मिळते. बोईसर पोलीस ठाण्यात सर्वात मोठा भंगार व्यवसाय असून याठिकाणी असलेल्या माफियांन कडूनच तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या रासायनिक कारखान्यातील रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी दिला जातो. येथील माफिया पोलीस व राजकीय पुढाऱ्यांच्या पाठबळावर जोमात असून कितीही तक्रारी केल्या तरी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. केमिकल माफियांन पासून ते लहान मोठ्या गुन्ह्यातील तडजोडी याठिकाणी नेहमीच सुरू असतात.
बोईसर पोलिस ठाणे हद्दीत गेल्या सहा महिन्यापूर्वी बेटेगाव पोलीस चौकीवर 20 हजाराची लाच घेताना दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. याअगोदर देखील बेटेगाव चौकीवर वसुली बाबत तक्रारी पालघर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या परंतु त्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. बेटेगाव येथील पोलीस चौकीवर दोन पोलिसांवर हप्तेखोरीत करताना कारवाई झाल्यानंतर काही काळ बोईसर पोलिसांनी सावध भुमिका घेतली. मात्र जानेवारी पासून नवीन वर्षात पुन्हा आपल्या वसुलीच्या भुमिकेत सुसाट वेगाने सुटले. तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखाने असल्याने याठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पेक्षा बोईसरचे पोलीस सक्रिय दिसतात. परंतु पोलीस फक्त नजर ठेवून आपले टार्गेट पुर्ण करत आहेत का हा प्रश्न समोर येतो, याचे कारण देखील तसेच आहे. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोईसर पोलिसांना त्यांच्या हितचिंतकांने ओम फार्मा नामक तारापूर मधील कारखान्यात ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवला जात असून त्याबाबत परवाना नसल्याची माहिती मिळाली. यानंतर औद्योगिक क्षेत्राची हद्द असलेल्या पोलिस अधिकारी यांना याठिकाणी न पाठवता नवीन आलेल्या महिला अधिकाऱ्यांना या कारखान्यात पाठविण्यात आले होते. साधारण एफ्रिल महिन्यात हा प्रकार घडला परंतु पुढे काहीही कारवाई झाली नाही. असाच प्रकार एनजीएल कारखान्यात देखील घडला असून याठिकाणी घातक रसायन वाहतूक करणारा टँकर पकडण्यात आला होता. परंतु याबाबत देखील काहीही सुगावा बोईसर पोलिसांनी लावून दिला नाही. महत्त्वाचे म्हणजे संबंधित कंपनी व पोलीस व त्यांचे हस्तगत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
बोईसरच्या साहेबांना ठाण्याच्या सुभेदारांने मागच्या वेळी आशिर्वाद दिल्याने त्यांना अधिक बळ मिळाले. ठाण्या पर्यंतचा प्रवास हा बोईसर मधील सद्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका पदाधिकाऱ्यांने केला. यामुळे औद्योगिक क्षेत्र असलेले मोकळे रान पुन्हा मिळाले. बोईसर पोलीस ठाण्यात हवलदार पासून ते पोलीस उपनिरीक्षक पर्यंत कोणालाही महत्त्व नाही तेवढे महत्त्व मोठ्या साहेबांन सोबत असलेला त्यांचा उजवा डावा “मनिष” नावाचा इसमाचा बोलबाला आहे. औद्योगिक क्षेत्राचा विभाग जरी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या कडे असला तरी याठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड असो किंवा कागदी वजनदार कवर आणणे असो सर्व काम साहेबांचा वफादार उजवा डावाच करतो. दिवसभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या या खाजगी इसमाला कोणीही काही बोलत नाही. एवढेच नाही तर चांगल्या दर्जाचे मासे असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरपोच पाठविण्यासाठी साहेबांचा वफादार उजवा डाव्यालाच काम दिले जाते. यामुळे कोणी तक्रार केली तरी मोठे साहेब तर सोडाच उजव्या डाव्याचे ही कोणी काही वाकडे करू शकत नाही.
मुंबई पोलीस दलातील “वाझे” नावाचा मासा पोलिसांच्या तावडीत सापडला तसा बोईसर मधील “वाझे” कोण याचा तपास करणे गरजेचे आहे. बोईसर मधील तर एका व्हाट्सएप ग्रुपमध्ये “कसाब” या नावाने त्यांचे वर्णन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बोईसर पोलिसांन विषयी समाजात पसरलेला प्रचंड रोष बोईसर मधील पोलिसांना लाचलुचपत विभागाने पकडल्यानंतर समोर आला आहे. बोईसरचे पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ यांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दोन दिवसापूर्वी पकडले. यामुळे बोईसरच्या लाचखोरीची पुरावा पुन्हा समोर आला. मात्र पालघरचे पोलीस अधीक्षक यांना काही बोईसर मध्ये लक्ष देण्यासाठी सवड आहे का काय चालले आहे बोईसर मध्ये यावर वेळी आवर घालणे गरजेचे आहे. पाच महिन्यात दोन वेळा एकाच पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाने कारवाई करणे म्हणजे अधिकाऱ्यांच्या कामाची पोचपावती समोर येते. एक अधिकारी जरी तावडीत सापला असला तरी याचे सुत्रधार म्हणजे वरपर्यंत पोचविण्याचे काम करणारा बोईसरच्या “वाझे’ चे काय हा प्रश्न उपस्थित राहत आहे. बोईसर पोलीस ठाण्याला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीवर पोलीस अधीक्षक काय फवारणी करतात हे पाहत राहण्या व्यतिरिक्त काहीही आपण करू शकत नाही.