◾मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश भागात घडली घटना; वर्षभरात महामार्गावर तिन बिबट्यांचा मृत्यू
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश गावच्या परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अशाच प्रकारे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे आतापर्यंत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. जंगली प्राण्यांचा वावर या महामार्गावर जास्त असल्याने याठिकाणी महामार्गावर कुंपण झाले गरजेचे असताना देखील याकडे दुर्लक्ष केल्याने असे अपघात याठिकाणी वारंवार घडत असल्याचे दिसून येते.
पालघर जिल्ह्यातून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी घनदाट जंगल असलेल्या भागात जंगली प्राण्यांचा वावर असतो. रविवारी रात्री साधारण 8 वाजताच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाची धडक बसून नर जातीच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत बिबट्या सोबत काही लोकांनी गर्दी करत फोटो काढले होते. त्यानंतर सोशलमिडीयावर ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. राष्ट्रीय महामार्ग जंगल भागातून जात असल्याने रात्रीच्या वेळी बिबटे भक्ष्याच्या शोधात महामार्गावर येतात व वाहन चालकांना अंधारात न दिसल्याने धडकून बिबट्याचा मृत्यू होतो. गेल्या वर्षभरात याभागात तिन बिबट्याचा मृत्यू झाला असून यावर उपाययोजना करण्यासाठी वनविभाग देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तरी ज्या महामार्गाच्या ज्या भागात घनदाट जंगल आहे व वन्यप्राणी रस्त्यावर येऊ शकतात अशा ठिकाणी महामार्गाच्या बाजूला संरक्षक जाळ्या वनविभागाने बसवाव्यात म्हणजे अशा प्रकारे दुर्मिळ वन्यजीवांचा मृत्यू होणार नाही अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.