पालघर दर्पण: प्रतिनिधी
विरार: किल्ले वसई मोहीम परिवार, महाराष्ट्र व युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत पालघर जिल्ह्यातील मांडवी कोट किल्ल्यावर माहिती फलक मोहिमेची सुरुवात करण्यात आली. गेली काही महिने कोरोनामुळे दुर्गसंवर्धन मोहिमा बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आलेल्या होत्या. सध्या दुर्गमित्र प्रतिनिधीनी पूर्वनियोजित काही उपक्रमात योग्य खबरदारी घेत व अत्यंत मोजक्या प्रतिनिधीना सोबत घेत हळूहळू मोहिमा पूर्णत्वास नेण्यासाठी सुरुवात केलेली आहे.
आजच्या मोहिमेत मांडवी कोटाच्या इतिहास माहितीचे संक्षिप्त फलक लावण्यात आला. युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत उपलब्ध झालेल्या आर्थिक मदतीने मांडवी कोटावर फलक लावण्यात येत आहेत. गेल्या काही मोहिमांत मांडवी कोटावर सुस्थितीत ठेवण्यात आलेल्या मुर्त्या पाहता अनेक स्थानिक जिज्ञासू दुर्गमित्रांची पावले मांडवी कोटावर भेट देण्यासाठी येत आहेतच. मोहिमेच्या प्रतिनिधी गेल्या वर्षभरात नियोजन आराखडा केलेल्या बाबींपैकी माहिती फलक ही अत्यंत महत्वाची मोहीम होती. आजचा पहिला फलक संवर्धन करण्यात आलेल्या मूर्त्यांच्या डाव्या अंगास (मुख्य प्रवेशद्वाराच्या आत उजव्या अंगास) बसविण्यात आला. सोबतच दुर्गमित्रांना व अभ्यासकांना मांडवी कोटाचे निश्चित स्थळ, इतिहास, नकाशा, वास्तुविशेष उपलब्ध होण्यासाठी इतर फलक नियोजित झालेले आहेत. आजच्या मोहिमेत वास्तुदेवता पूजन, फलक पूजन, गडदेवता पूजन, स्वच्छता मोहीम करण्यात आले. आजच्या मोहिमेत इतिहास अभ्यास डॉ श्रीदत्त राऊत, प्रशांत सातवी, दीपाली पावसकर इत्यादी स्थानिक दुर्गमित्र उपस्थित होते.
युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे प्रमुख प्रशांत सातवी यांच्या मते “मांडवी कोटाच्या गतवैभव संवर्धनासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे हे उद्दिष्ट असून प्रत्येक नवीन उपक्रमात अभ्यासपूर्ण भटकंती नव्या संशोधनास वाव देते.” तर किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधी दिपाली पावसकर यांनी सांगितले कि “मांडवी कोटावर सातत्याने संवर्धनासाठी विविध पैलू नियोजित आराखडा लक्षात घेऊन पूर्ण करण्यात येत आहेत, त्यावर कार्यरत राहण्यासाठी स्थानिक दुर्गमित्रांचे सहकार्य मिळत आहे.”


















