◾️बोईसरमध्ये दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा सापडला होता मृतदेह; स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने लावला आरोपीचा शोध
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शहरात दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह तारापुर औद्योगिक क्षेत्रात सापडल्याने खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळच्या वेळी अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सायंकाळी पर्यंत यातील आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बोईसर धोडीपुजा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या पाठीमागे राहत असलेल्या ५ वर्षीय आयुष बलराम नायक हा दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता. दुपारी १ वाजेच्या दरम्यान अंगणात खेळत असताना काही वेळाने मुलगा आयुष अंगणात दिसेनासे झाल्यानंतर आईसह नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला होता. उशिरा पर्यंत मुलगा सापडला नसल्याने घरच्यांनी बोईसर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस व नातेवाईक आयुष याचा शोध घेत असताना दोन दिवसा नंतर बुधवारी तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रुचिरा बारच्या बाजुला असलेल्या नाल्याच्या वर पाय बांधलेल्या स्थितित आयुषचा मृतदेह सापडला.
बोईसर पोलिसांन सह स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने आरोपीचा मागोवा घेण्यासाठी दिवसभर शोधकार्य सुरू केले. या घटनेत सुरूवातीला दोन संशयीतांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी करण्यात आली मात्र चौकशीत काही निष्पन्न झाले नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले. बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मयत झालेल्या मुलाच्या बाजूला राहत असलेल्या एकाला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची खात्रीशीर माहिती पालघर दर्पण ला खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आरोपी बाबत माहिती देण्यासाठी नकार दर्शविला. आरोपीला अटक केल्याबाबत व अधिक माहिती पत्रक काढून देणार असल्याने बोईसर मधील पोलिसांनी माहितीची गुप्तता पाळली आहे.


















