◾अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांची पुनश्च निवड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मुंबई: द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधीसाठी निवडणूक अधिकारी दिलीप कदम यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
राज्य केमिस्ट संघटनेची कोविड १९ च्या पाश्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देश प्रमाणे ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली. संघटनेचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप कदम, सुनिल छाजेड यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज आल्याने आजच्या आयोजित सर्वसाधारण सभेत नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे- कल्याण, उपाध्यक्ष मुकूंद दुबे- चंद्रपूर, अरुण बरकसे- बीड, सचिव अनिल नावदंर- खामगाव, सह सचिव प्रसाद दानवे- मुंबई, खजिनदार वैजनाथ जागुष्टे- रत्नागिरी, संघटन सचिव मदन पाटील- कोल्हापूर तर पीआरओ पदी अजित पारख याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
कार्यकारिणी सभेत ऑनलाइन फार्मसी विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. कोविड 19 अंतर्गत केमिस्ट ने केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. करोनाची लस सर्व केमिस्टच्या माध्यमातून वितरित करण्याबाबत देखील विचार मांडण्यात आले. ऑनलाइन फार्मसीवर तात्काळ प्रतिबंध न आणल्यास भविष्यात वेगळी नीती अवलंबण्यात येईल असे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.
	    	

















